डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी त्यांची धोरणे व विचार डोळ्यासमोर ठेवून वागणे महत्त्वाचे असल्याचे मत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केले. चाकूरकर यांनी सांगितले की, आम्ही दोघांनी समाजकारण व राजकारणात एकत्रित काम केले. ते मला वरिष्ठ होते. अनेकवेळा त्यांची मला मदत झाली. जात, धर्म, जिल्हा,भाषा याचा विचार न करता सर्वांना सोबत घेऊन ते काम करत असत. मंत्री, मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम लक्षात राहणारे आहे.आपल्याला एखाद्या व्यक्तीचे जिल्ह्यात झालेले काम दिसू शकते परंतु राज्य आणि देशासाठी त्यांनी केलेले कार्य आपल्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय त्याची कल्पना येत नाही.
डॉ. निलंगेकर यांनी विविध पदावर काम करताना धोरणे व नीती बनवण्याचे काम केले.हे काम सर्वांच्या लक्षात येणारे आहे. सिंचन क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य महत्त्वाचे आहे. हे कार्यदेखील आपल्याला माहित आहे. राज्यातील मध्यमवर्गीय,विद्वान, सामान्य माणूस, गोरगरीब प्रत्येकाला ते आपुलकीने वागवत असत,असेही चाकूरकर म्हणाले. चाकूरकर यांनी सांगितले की, अशा व्यक्ती जेव्हा जातात तेव्हा कमतरता जाणवते.अशावेळी ही कमतरता ,पोकळी भरून काढण्यासाठी त्यांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून वागणे आवश्यक असते. कोणतीही व्यक्ती गेल्यानंतर वाईट वाटणे सहाजिक आहे परंतु त्यांचा विचार समोर ठेवून आपण वागलो तरचही पोकळी भरून निघू शकते,असेही ते म्हणाले.