महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आमच्या निलंगा तालुक्याची शान डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर उपाख्य दादा यांच्यावर पुण्यातील दवाखान्यात काळाने झडप घातली..दादांनी वयाच्या ९१ व्या वर्षी कोरोना सारख्या गंभीर आजारावर मात केली होती.त्यांना कोविड पॉझीटीव्ह वॉर्डमधून कोविड निगेटिव्ह वॉर्डमध्ये दाखल केले होते..दादांनी या काळातही संघर्ष केला.महाराष्ट्राच्या राजकारणातला एक शुचिर्भूत नेता हरपला..अत्यंत साफसुतरी राहणीमान,उच्च विचार आणि विकासाचा धगधगता अग्निकुंड आज शांत झाला..दादाना भेटून आल्यावर एक संजीवनी मिळायची..सत्तेच्या प्रांगणात कधीही, कुणासमोरही न झुकणारे दादा आमचे आदर्श आहेत..निलंग्याच्या प्रत्येकाची मान अभिमानाने ताठ राहते असे दादा खरंच आजही तसेच आहेत..काल परवा घरी गेलो होतो,भरपूर गप्पा झाल्या.थोडीशी स्मृती विस्मरणात जात होती तरीही मुंबईच्या पक्षाच्या बैठकीला दादा हजार होते..अधूनमधून कार्यक्रमाला हजेरी असायची..दादांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्वाचे निर्णय केले..पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी केलेली कामे आजही शेतकर्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवत आहेत..दादांनी स्वतःच्या चारित्र्याला खूप सांभाळलं..
अपेयपान आणि निषिद्ध खाद्य त्यांनी केलंच नाही म्हणून दादा आज राजकारण्यांचे आदर्श आहेत.राजकारणात आता असे मैलाचे दगड खूप कमी आहेत..पावलापावलावर चकल्या देणार्या,मोहाला बळी पडणार्या राजकारणात दादा साफसूतरे राहिले..स्वच्छता हा त्यांचा महत्वाचा गुण.. ते मुख्यमंत्री असताना अनेकदा त्यांच्या बेडरूम पर्यंत जाऊन बोलण्याचा योग आला..दादाशी बोलून बाहेर पडलो की मी महाराष्ट्रातील आजच्या राजकारण्याशी तुलना करायला लागतो..इतकी निरपेक्ष,निष्कलंक माणसे आज राजकारणात दिसत नाहीत..दादांना फक्त एक कलंक लागला,तो खरा की खोटा याचा विचारही न करता त्यांनी राजीनामा दिला.त्याच बेसवर ते आज ताठ मानेने उभे आहेत..पद,प्रतिष्ठा राजकारणात महत्वाची असते त्यांनी ती जपली..संस्थात्मक आणि पाटबंधार्याचे जाळे त्यांनी निर्माण केले..ज्यांना दादांना जवळून पहायचे आहे आणि बोलायचे आहे, त्यांनी एकदा त्यांच्या स्पेशल संग्रहालयाला भेट द्यावी..दादा राजकारणात दादा माणूस म्हणूनच जगत आहेत..मला अजूनही माझे बालपण आठवते,दादा माझ्या गावात यायचे म्हटले की,स्त्रिया तासनतास डोक्यावर पाण्याच्या घागरी घेऊन उभ्या असायच्या..स्वागतासाठी गावेच्या गावे सज्ज असायची..त्यांच्या वागण्या,बोलण्यात कमालीची गोडी होती..तासनतास बोलत राहावे वाटायचे..दादांच्या पाठीमागे आज त्यांचे चिरंजीव अशोक पाटील राजकारणात आहेत..दादांच आयुष्य प्रचंड समाधानच होत..राजकारणात एक दरारा होता,शेवटपर्यंत गांधी कुटुंबाशी त्यांची पक्की नाळ होती..
राजकारणात आता अश्या नेत्यांची वाणवा आहे..महाराष्ट्राच्या राजकारणात आज रोज आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत,अश्या परिस्थितीत दादा मला स्थितप्रज्ञासारखे वाटतात..आजही मी महाराष्ट्रात फिरताना अनेक कार्यालयात,रेस्ट हाऊसवर काम करणारे कर्मचारी भेटले की,निलंगेकर साहेबामुळे आम्ही आहोत हे सांगितले की ऊर भरून येतो..निलंगा येथील आहोत असे सांगताच निलंगेकरांचा निलंगा का?असे म्हटले की मान ताठ होते,दादांनी आमची ओळख निर्माण केली आणि स्वाभिमान जपत राजकारण करण्याचा एक मंत्र त्यांनी दिला..राज्यमंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, संसदीय कार्य, आरोग्य, तंत्रशिक्षण, दुग्धविकास, विधी व न्याय, सहकार, सांस्कृतिक कार्य. मुख्यमंत्रीपद भूषविल्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात महसूल हे खाते त्यांच्याकडे होते.१९९० ते १९९१ या काळात ते कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद होते.महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली होती..यशवंतरावांचा सुसंस्कृतपणा,वसंतदादाचे धाडस आणि शंकरराव चव्हाणांचा बाणेदारपणा या सगळ्या गुणांचा मिलाप त्यांच्यात होता.पक्षाशी एकनिष्ठ असलेले निलंगेकर कधीच कसल्याही राजकीय प्रलोभनास बळी पडले नाहीत.पक्षाच्या विरोधात काही केल्यास जायचे नाही ही भूमिका कायम रुजवण्याचे काम त्यांनी केले.राजकारणातला संधीसाधूपणा त्यांच्याकडे नव्हता म्हणून पक्षात कायम ताठ मानेने ते जगले.औरंगाबादचे उच्च न्यायालय इमारत ही त्यांच्या काळातील महत्वाचे काम होय.निलंगा औद्योगिक वसाहत,
उदगीर औद्योगिक वसाहत,लातूर औद्योगिक वसाहतीचे क्षेत्र वाढवण्यासाठी केलेले कार्य,औसा पाणीपुरवठा,निलंगा,उदगीर पाणी पुरवठा,सिंचनाचे सर्व जिल्ह्यातील प्रकल्प उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे.गाव तिथे शाळा ही त्यांची अभिनव संकल्पना महाराष्ट्र शासनाने उचलून धरली आणि शाळांचा विस्तार करण्यात आला.स्वतःच्या महाराष्ट्र शिक्षण समितीतून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मार्ग खुला करून देण्यात ते अग्रभागी होते.दादांना नीटनेटकेपणा खूप आवडायचा..शिस्त ही अंगभूत असल्याने दादांनी राजकारण असो की समाजकारण किंवा पक्षीय शिस्त असो कधीच मोडली नाही.एक प्रगल्भ नेता आज आपल्यात राहिला नाही.साधा ग्रामपंचायत सदस्य झाला तर गुरगुरणार्या राजकीय परिस्थितीत दादांनी अत्यंत संयमाने राजकारण केले.मी दादांच्या सगळ्याच निवडणुका जवळून पाहिल्या आहेत.त्यांनी विरोधकांवर कधीच खालच्या पातळीवर जावून टीका केली नाही.उलट आपण प्रतिक्रिया द्या असे म्हटले की, ते म्हणायचे तो त्यांचा प्रश्न आहे आपण का घसरायचे.अशोकराव पाटील यांच्यात हेच गुण असल्यामुळे शांत आणि संयमाने राजकारण करण्याकडे त्यांचाही कौल असतो. दादा आयुष्यात कुणासमोरच झुकले नाहीत,अगदी नियती समोर सुध्दा..म्हणून आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहिले.कॉंग्रेस पक्षाच्या जडणघडणीत आणि विकासात त्यांचा महत्वाचा वाटा होता.ते ना पक्षासमोर झुकले ना नेत्यांसमोर..अगदी ताठ कणा असलेला कणखर नेता आज आपल्यात नाही..राजकारणाची अशी आचारसंहिता जपणारा नेता आता होणे नाही..त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…संजय जेवरीकर, ज्येष्ठ पत्रकार,सरपंच