केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ भारत सर्व्हेक्षण २०२० चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यात लातूर शहर हे देशात १३७ व्या क्रमांकावर आहे. केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्यावतीने हरदिपसिंह पुरी यांनी याची घोषणा केली. स्वच्छ भारत सर्व्हेक्षणाचे हे पाचवे वर्ष आहे. लातूर शहर महानगरपालिकेने स्वच्छ भारत सर्व्हेक्षण २०२० मध्ये सहभाग नोंदवला होता.
त्यादृष्टीने संपूर्ण शहरात रंगरंगोटी, स्वच्छता यासह विविध उपक्रम राबविण्यात आले होते. १ ते १० लाख लोकसंख्या असणार्या शहराची नॅशनल रँकींग जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार उदगीर शहर ५५ व्या क्रमांकावर आहे. त्यांचा स्कोअर ३८११.७३ आहे. नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका ६० व्या क्रमांकावर आहे त्यांचा स्कोअर ३७५७.५४ आहे.
तसेच लातूर शहर १३७ व्या क्रमांकवर असून त्यांचा स्कोअर २९६०.३५ आहे. स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान हे २८ दिवसामध्ये पूर्ण करण्यात आलं होतं. स्वच्छता ऍपवरुन १ कोटी ७० लोकांनी अभियानासाठी नोंदणी केली होती. सोशल मिडीयावरुन ११ कोटी लोकांनी अभियानाला प्रतिसाद दिला होता. स्वच्छ भारत सर्व्हेक्षणामध्ये आपली रॅकींग आणखी सुधारावी यासाठी लातूर शहर महानगरपालिकेस आणखी परिश्रम घ्यावे लागणार आहेत.