गर्दी ; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाहिंगोली / प्रतिनिधीजिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ६ ऑगस्ट ते १९ ऑगस्टदरम्यान जिल्हाभरात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली होती. मात्र लॉकडाऊन शिथील होताच हिंगोली शहरात नागरीकांनी प्रचंड गर्दी केल्याने जिल्हा प्रशासनाने लावलेल्या लॉकडाऊनचा फायदा काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांना तर मास्कचाही विसर पडल्याचे दिसून आले. कोरोना साथरोग थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासन रात्रंदिवस काम करीत आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग पाहता ६ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट दरम्यान चौदा दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता.
या काळात व्यापार्यांच्या रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आल्या. त्यानंतर व्यापार्यांना दुकान उघडण्याची मुभा देण्यात आली. २० ऑगस्ट रोजी लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर पहिल्याच दिवशी नागरीकांनी शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शहरातील मुख्य रस्त्यावर झालेल्या गर्दीमुळे वाट काढणेही शक्य नव्हते. अनेकांना तर मास्कचाही विसर पडला होता. ही गर्दी पाहता सोशल डिस्टन्स म्हणजे काय, असा प्रश्न आता पुढे येऊ लागला आहे. दोन दिवसांवर गणपती स्थापना व महालक्ष्मीचा सण आल्याने नागरीकांनी बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी केली होती. अनेक बॅकांंसमोर लांबच लांबा रांगा लागल्या होत्या. एकीकडे प्रशासन कोरोनाला थांबविण्यासाठी प्रयत्न करीत असताना नागरीक मात्र बेजबाबदारपणे वागत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे कोरोनाला थांबवायचे असेल तर नागरीकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे.