हिंगोली / प्रतिनिधीआंतरराष्ट्रीय बाजारात लाखो रुपये किंमत असलेल्या दुर्मिळ प्रजातीच्या मांडूळाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना हिंगोली पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन जिंवत मांडूळ जप्त करण्यात आले आहेत. या मांडूळ जातीच्या सापाची किंमत अंदाजे 15 लाख रुपये एवढी आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत धक्कादायक बाब समोर आली आहे. सेनगाव तालुक्यातील देऊळगाव जहागीर गावातील व हिंगोली तालुक्यातील सरकळी या गावातील सतीश कांबळे व दत्तराव साठे हे मांडूळ प्रजातीचे जिवंत साप बाळगून त्याची चोरटी तस्करी करून त्याची विक्री करण्यासाठी बाळगून आहेत. त्यानंतर पथकाने हिंगोली येथील सर्पमित्र विश्वंभर पटवेकर यांना सोबत घेऊन सेनगाव तालुक्यातील देऊळगाव जहागीर येथे जाऊन सतीश महादू कांबळे ( वय 23 ) याच्या घराची तपासणी केली. यावेळी एका बादलीत ठेवलेला काळसर रंगाचा मांडूळ प्रजातीचा 2 किलो ग्रॅम वजनाचा जिवंत साप आढळून आला.
या अडीच फूट असलेल्या सापाची किंमत अंदाजे 10 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. तसेच दुसऱ्या कार्यवाहीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हिंगोली तालुक्यातील सरकळी येथील दत्तराव साठे ( वय 45 ) याच्या घराची तपासणी केली असता यावेळी 1 किलो ग्रॅम वजनाचा एक जिवंत मांडूळ जातीचा साप आढळून आला. या सापाची अंदाजे 5 लाख रुपये किंमत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोन्ही आरोपींनी राहत्या घरामध्ये वाइल्ड लाइफ वॉर्डन यांच्या परवानगीविना मांडूळ प्रजातीचे दोन साप अंदाजे 15 लाख रुपये किमतीचे चोरटी विक्री/तस्करी करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगले. त्यामुळे पुढील कारवाईसाठी या दोन्ही आरोपींना मांडूळ प्रजातीच्या दोन्ही सापासह विभागीय वनाधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे, शिवसांब घेवारे, बालाजी बोके, शंकर जाधव, विलास सोनवणे, राजूसिंह ठाकुर, शंकर ठोंबरे, आकाश टापरे, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली.
आघोरी विद्येसाठी मांडूळची तस्करी
मांडूळ या सापाचा काळी जादू, अघोरी विद्या, गुप्त धन शोधण्यासाठी, पैशांचा पाऊस पाडण्यासाठी, सट्टाचे आकडे काढण्यासाठी उपयोग होतो. अशी अंधश्रद्धा आहे असून विविध प्रकारच्या अंधश्रद्धेने दुर्मीळ मांडून सापाची तस्करी केली जात असल्याचे बोलले जात आहे. मांडूळाची किंमत लाखांच्या घरात असते.
कशासाठी वापरतात ?
असे म्हणतात की, या सापाचा वापर कॅन्सरच्या उपचारासाठी आणि लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी केला जातो. याने इरेक्टाइल डिस्फंक्शन ही समस्या दूर होत असल्याचं बोललं जातं. त्यासोबतच सांधेदुखीवरही याचा वापर केला जातो तसेच या सापाची कातड्याचा वापर कॉस्मेटिक्स, पर्स, जॅकेटसाठीही केला जातो असेही म्हटले जाते. तर मलेशियात या सापाबाबत एक अंधविश्वास प्रचलित आहे. लोक इथे मानतात की, लाल मांडूळ साप व्यक्तीचं नशीब चमकवू शकतो.