ज्ञानेश्वर लोंढे / हिंगोली कोरोनामुळे गेल्या 10 महिन्यांपासून जनजीवन ठप्प झाले होते. कोरोना लस कधी येते याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर शनिवारी ही प्रतीक्षा संपली असून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरवात झाली आहे. शनिवारी राज्यातील 36 जिल्ह्यात देण्यात आलेल्या उद्दिष्टात केवळ हिंगोली जिल्ह्याने 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करून राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. तर रायगड आणि पुणे जिल्हा इतर जिल्ह्याच्या तुलनेत उद्दिष्टापासून दूर राहिला आहे. कोरोना रुग्ण बरा होण्याचा रिकव्हरी रेटही राज्यात हिंगोलीचा एक नंबर वर आहे.
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने ही लस तयार केली असून, राज्यासाठी 9 लाख 63 हजार डोस मिळाले आहेत. आजपासून म्हणजे 16 जानेवारी पासून कोरोना लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 285 केंद्रांवर तयारी करण्यात आली होती. प्रत्येक केंद्रावर 100 प्रमाणे सुमारे 28 हजार 500 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी राज्यातील 36 जिल्ह्याल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळे उद्दिष्ट देण्यात आले होते. हिंगोली जिल्ह्यात 200 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट होते. यामध्ये कळमनुरी 100 तर हिंगोली 100 अशाप्रकारे हे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण केले आहे. तर राज्यात दुसऱ्या क्रमांकावर भंडारा जिल्ह्याने 300 पैकी 262 लाभार्थ्यांना कोरोना लस देऊन 87.33 टक्के एवढे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

व तिसऱ्या क्रमांकावर अमरावती जिल्ह्याने 500 पैकी 404 लाभार्थ्यांना कोरोना लस देऊन 80.80 पूर्ण केले आहे. याउलट राज्यात कोरोना लसीकरणाबाबत पिछाडीवर राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये रायगड जिल्ह्याने 400 लाभार्थ्यांना पैकी केवळ 136 लाभार्थ्यांना कोरोना लस देऊन 34 टक्के एवढे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. तर पुणे जिल्ह्याने 3100 लाभार्थ्यांना पैकी 1176 लाभार्थ्यांना कोरोना लस देऊन 37.94 टक्के एवढेच उद्दिष्ट पूर्ण केले आहे. नांदेड जिल्ह्याने 500 लाभार्थी पैकी केवळ 198 लाभार्थ्यांना कोरोना लस देऊन 39.60 टक्के एवढे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. संपूर्ण देशाला पुण्यातून लस पुरवण्यात येत असली तरी प्रत्यक्ष लसीकरणात आरोग्य यंत्रणेला आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे पुणे प्रशासन शनिवारी कोरोना लसीचे उद्दिष्ट पूर्ण करू शकले नाही.
आरोग्य यंत्रणेचे यश – जिल्हाधिकारी जयवंशी जिल्ह्यात कोव्हिड-19 या साथरोगाविरुध लढा देतांना प्रत्येक विभागाचे योगदान हे खुप मौल्यवान आहे. आरोग्य विभागाने स्वत:चा जीव धोक्यात घालून दिवस-रात्र मेहनत केली. त्यांचे योगदान हे अमुल्य आहे. त्यामुळेच आरोग्य विभागाच्या कर्माचाऱ्यांना लसीकरण करुन या लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात येत आहे.
तसेच जिल्ह्यातील शासकीय व खाजगी आरोग्य कर्मचाऱ्यांचा समान समावेश या लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा, पोलीस अधिक्षक राकेश कलासागर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. राहुल गित्ते, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, जिल्हा लसिकरण अधिकारी, डॉ. प्रेमकुमार ढोंबरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश टेहरे तालुक आरोग्य अधिकारी डॉ. सतिश रुनवाल, डॉ. नामदेव कोरडे, यांची उपस्थित होते.