लातूर/ – कोरोना काळात करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान गोलाई परिसरात वाहनाची गर्दी होऊ नये याकरीता गोलाई परिसरातील विविध रस्त्यांवर बॅरीकेटस् करण्यात आले होते. मात्र हे बॅरीकेटस् आता गैरसोयीचे ठरत असून याचा ग्राहकांना व व्यापार्यांनाही त्रास होऊ लागला आहे. ही बाब लक्षात घेऊन हे बॅरीकेटस् तात्काळ काढण्यात यावे या मागणीसाठी हजार स्वाक्षर्यांचे निवेदन मराठवाडा व्यापारी महासंघाच्या वतीने दिनेश गिल्डा यांच्या उपस्थितीत मनपा आयुक्त मित्तल यांना देण्यात आले. याबाबत आठ दिवसात निर्णय घेऊ अशी ग्वाही मनपा आयुक्तांनी मराठवाडा व्यापारी महासंघाला दिली आहे.
शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या गोलाई परिसरात विविध वस्तूंच्या खरेदीसाठी शहरातील विविध भागातील नागरिक दररोज गर्दी करीत असतात. मात्र कोरोना काळात झालेल्या लॉकडाऊन दरम्यान खरेदीसाठी गर्दी होऊ नये आणि वाहनाचींही वर्दळ कमी व्हावी याकरीता गोलाई परिसरातील विविध रस्त्यांवर बॅरीकेटींग करून वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. आता कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागेलेला असून कोरोना प्रतिबंधाकरीता लस सुद्धा उपलब्ध झालेली आहे. तसेच या बॅरीकेटस्मुळे ग्राहकांना व व्यापार्यांना मोठ्या त्रासा सामोरे जावे लागत आहे. विशेषतः या परिसरात राहणार्या नागरीकांना तर आपली वाहने घरापासून दूर थांबवावी लागत आहे. त्यातच काही दिवसापुर्वी गोलाई परिसरात आगीची दुर्घटनाही घडली होती. ही आग विझविण्यासाठी अग्निशामन दलाच्या वाहनांना कसरत करावी लागली होती. ही बाब लक्षात घेऊन गोलाई परिसरातील बॅरीकेटस् काढण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागलेली आहे.
व्यापारी व ग्राहकांच्या हितासाठी गोलाई परिसरातील बॅरीकेटस् काढण्यात यावे या मागणीकरीता मराठवाडा व्यापारी महासंघाच्या वतीने हजार स्वाक्षर्यांचे निवेदन मनपा आयुक्तांना देण्यात आलेले आहे. सदर निवेदन देताना मराठवाडा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दिनेश गिल्डा यांनी या बॅरीकेटस्मुळे होणार्या त्रासाबाबत मनपा आयुक्तांना विस्तृत माहिती सुद्धा दिली. याप्रकरणी आठ दिवसात निर्णय घेऊ अशी ग्वाही मनपा आयुक्तांनी मराठवाडा व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळास दिली आहे.