लातूर , दि. २९ : लातुरात कार्यरत असतांना आपण नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. लातूर हे प्रेमळ, प्रेम देणारे शहर असून आपण शहराला कधीही विसरू शकणार नाही, असे भावनिक उदगार माजी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी काढले. लातूर व्यापारी महासंघाच्या वतीने जी.श्रीकांत व उपविभागीय अधिकारी सचिन सांगळे यांचा निरोप व नूतन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी, नूतन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांचा स्वागत समारंभ रविवारी सायंकाळी हॉटेल ग्रँड सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी जी. श्रीकांत बोलत होते.
यावेळी बोलतांना श्रीकांत यांनी लातूरच्या कार्यकाळासह आपल्या व्यक्तिगत जीवनातील अनेक आठवणींनाही उजाळा दिला. लातूरच्या पाणी टंचाईच्या परिस्थितीचा सामना करतांना आलेल्या प्रसंगासोबतच पाणी टंचाईमुळे लागलेला लातूरचा पाण्याचा कलंक दूर करण्याच्या दिशेने आपण पाऊल टाकले आहे. पुढील काम आपले नवे सहकारी निश्चित पूर्ण करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लातूर शहराचे वैभव समजल्या जाणार्या गंज गोलाईतील अतिक्रमण काढण्याच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी गोलाईने कसा मोकळा श्वास घेतला, त्याची आठवण काढली. लातूरला आलेले तिन्ही नूतन अधिकारी तरुण, धडाडीचे असल्याने लातूरच्या विकासासाठी त्यांचे योगदान मोलाचे राहील, असे सांगून जी. श्रीकांत ,म्हणाले की, कोरोना काळात व्यापार्यांनी आलटून – पालटून दुकाने उघडावीत, याबाबत आपण घेतला होता.
ती त्यावेळची राजकीय नेत्यांच्या आग्रहास्तव आपल्याला पुन्हा लॉकडाऊन लावावा लागला असला लॉकडाऊन आपल्या देशाला कधीही परवडणारा नसल्याचे प्रांजळ मत त्यांनी व्यक्त केले. व्यापारी वर्गानेही नेहमी व्यवसायातच गुंतून न पडता आपल्या परिवारांसह सुटीचा आनंद उपभोगवा, असा एक मित्र म्हणून आपला प्रेमाचा सल्ला असल्याचे त्यांनी सांगितले. आपण भविष्यात कुठेही लातूरला कदापि विसरणार माझ्या मुलीचा जन्मच याठिकाणी झालेला असल्याने एक लातूरकर कायम माझ्यासोबतच राहणार असल्याचे ते म्हणाले . नूतन अधिकारी मित्र लातूरचा नावलौकिक वाढेल असेच कार्य करतील. व्यापारी महासंघाने नूतन व बदलून जाणार्या अधिकार्यांचा एकाच व्यासपीठावर सत्कार करण्याचा जो पायंडा पाडला आहे, तो यापुढेही जोपासावा,असे आवाहन त्यांनी केले.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी आपले विचार व्यक्त करतांना सर्व लातूरकरांनी एकत्रित येऊन कोणताही बंद पाळायचा नाही,असा ठराव घेतल्यास येणार्या काळात लातूरच्या लौकिकात मोलाची भर पडेल असे नमूद केले. एखादी घटना घडल्यास त्याकडे कसे पाहायचे हे व्यापारी वर्गाकडून शिकण्यासारखे आहे, असे सांगून त्यांनी लातूरकरांना जी. श्रीकांत यांची उणीव आम्ही नूतन अधिकारी कधीही भासू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. नूतन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी लातूरचा जिल्हाधिकारी म्हणून काम करतांना आपण जी. श्रीकांत यांच्याप्रमाणेच काम करण्याचा प्रयत्न कार्यसे सांगितले. जिल्ह्याच्या विकासात व्यापार्यांचा वाटा मोठा असतो. व्यापारी व प्रशासनात चांगला समन्वय राहील, यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू,अशी ग्वाही पृथ्वीराज यांनी दिली. अभिनव गोयल यांनी जसे एपीजे अब्दुल कलाम हे लोकांचे राष्ट्रपती होते, तसे जी. श्रीकांत हे लोकांचे जिल्हाधिकारी होते, असे सांगितले. त्यांच्यासोबत चार महिने काम करण्याची संधी आपल्याला मिळाली. आपल्याला या कालावधीत त्यांच्याकडून खूप कांही शिकायला मिळाले,असेही त्यांनी नमूद केले. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांनी आपले विचार व्यक्त करतांना वरिष्ठ अधिकार्यांनी चांगले काम करण्याची संधी दिल्यामुळेच आपण लातुरात चांगले काम करू शकलो,असे सांगितले. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोलंकी यांनी आपल्या मनोगतात या सर्व अधिकारी मित्रांनी या सोहळ्यास उपस्थिती नोंदवून व्यापारी महासंघाचा सन्मान वाढविल्याबद्दल आभार व्यक्त केले.
प्रशासनातील चांगल्या अधिकार्यांमुळे अडचणी दूर होण्यास मोलाची मदत होते. व्यापार्यांच्या मनातील भीती कमी करण्याचे काम प्रशासन करीत असते. याठिकाणाहून बदलून जाणार्या अधिकार्यांनी पदोन्नतीने पुन्हा लातूरला यावे, अशी अपेक्षा व्यक्त करून नूतन अधिकार्यांनीही जी. श्रीकांत यांच्या प्रमाणेच सर्वांना उल्लेखनिय कार्य करावे, अशी अपेक्षा सोलंकी यांनी व्यक्त केली. व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष बसवराज वळसंगे यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. या प्रसंगी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचा सत्कार विनोद गिल्डा ,विश्वनाथ किनीकर यांनी केला. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचा सत्कार भारत माळवदकर, अरुण सोमाणी यांनी केला. अभिनव गोयल यांचा सत्कार राजेश फडकुले, दत्तात्रय पत्रावळे यांनी केला. सचिन सांगळे यांचा सत्कार निसार विंधानी यांनी केला.
कार्यक्रमाचे प्रास्तविक रामदास भोसले यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास भोसले व विनोद गिल्डा यांनी केले. यावेळी विविध व्यापारी संघटनांच्या वतीने जी. श्रीकांत यांचा सत्कार करण्याचा आला. कार्यक्रमास प्रदीप सोनवणे , चंदू बलदवा, नंदकिशोर अग्रवाल, धनंजय बेंबडे, कमल जोधवानी, रामेश्वर भराडिया, राघवेंद्र इटकर, रामेश्वर पुनपाळे , बसवराज मांगरुळे , सचिन कोचेटा, कमलकिशोर अग्रवाल, दिनेश गिल्डा, हेमंत भावसार, राजकुमार डावळे , पृथ्वीराज चव्हाण यांसह अनेक व्यापारी बांधव संख्येने उपस्थित होते.